भोसे / विशेष प्रतिनिधी : भोसे जिल्हा परिषद गटात होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सिद्धेश्वर रणे यांनी राजकीय समीकरणांचा सखोल अभ्यास करून उमेदवारी अर्जातून माघार घेतल्याची माहिती दिली आहे. त्यांनी भोसे जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

कमी कालावधीत विजयापर्यंत पोहोचणे अशक्य होते
यावेळी बोलताना रणे म्हणाले की, भोसे जिल्हा परिषद गटात मंगळवेढा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात अत्यंत हायव्होल्टेज निवडणूक होणार असल्याचे सुरुवातीपासूनच स्पष्ट झाले होते. विविध पक्षांची जोरदार तयारी, मोठ्या राजकीय नेत्यांचे लक्ष आणि बदलती राजकीय समीकरणे लक्षात घेता ही निवडणूक कमी कालावधीत जिंकण्यासाठी आवश्यक असलेली तयारी करणे कठीण असल्याचा अंदाज आला होता. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार आणि एकूण राजकीय परिस्थितीचा विचार करून या वेळी माघार घेणेच योग्य ठरेल, असा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय वैयक्तिक नसून भविष्यातील रणनीती लक्षात घेऊन घेतलेला आहे.
पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदारांनी दिला मोठा प्रतिसाद
मात्र या काळात पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने माझ्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली, ही बाब माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलेले सहकार्य अमूल्य असल्याचे रणे यांनी सांगितले. भोसे जिल्हा परिषद गटातील मतदारांनी गावभेट दौऱ्यादरम्यान दिलेला प्रतिसाद उत्साहवर्धक होता. मतदारांनी दाखवलेला विश्वास आणि प्रेम कधीही विसरता येणार नाही. या सर्वांचे जितके आभार मानावेत तितके कमीच आहेत, असे भावनिक शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
भोसे जि.प. गटाच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील राहणार
माघार घेतली म्हणजे राजकारणातून किंवा निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडलो, असा अर्थ काढू नये, असे स्पष्ट करत रणे म्हणाले, ही माघार तात्पुरती आहे. आगामी काळात याहीपेक्षा मोठी तयारी, संघटनात्मक ताकद आणि व्यापक जनसंपर्काच्या जोरावर मी भोसे जिल्हा परिषद गटातून निवडणूक नक्कीच लढवणार आहे.
भविष्यातही भोसे जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणार असून नागरिकांच्या संपर्कात सातत्याने राहून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.




















