नंदेश्वर | प्रतिनिधी : तांदुळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत वाहन कोसळून जवळपास चौदा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या घटनेनंतर शासनाने मृतांच्या नातेवाईकांना सुमारे ४० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करून दिलासा दिला आहे. मात्र या घटनेनंतर आता जिल्हाभरातील रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा विहिरींवर तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

वेळेत उपाययोजना केल्यास निष्पापांचे जीव वाचतील
शासनाकडून अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देणे ही मानवतेची बाब असली, तरी अशा दुर्घटना टाळण्यासाठी पूर्वतयारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक महत्त्वाच्या असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. लाखो रुपयांची मदत देण्याऐवजी त्याच निधीतून धोकादायक विहिरींना संरक्षण भिंती, लोखंडी कठडे किंवा त्या विहिरी बुजवण्याचे काम केल्यास अनेक निष्पापांचे जीव वाचू शकतात, अशी भावना व्यक्त होत आहे.

सोलापूर जिल्ह्यात अनेक गावांच्या हद्दीत रस्त्याच्या अगदी कडेला अशा धोकादायक विहिरी असून, त्याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. विशेषतः पावसाळ्यात किंवा रात्रीच्या वेळी या विहिरी मोठ्या अपघातांना कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे तांदुळवाडीसारखी दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये, यासाठी प्रशासनाने केवळ मदत जाहीर करण्याऐवजी प्रतिबंधात्मक कामांवर भर देणे काळाची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नंदेश्वर येथील धोकादायक विहीर बुजविनेच महत्वाचे
याच पार्श्वभूमीवर नंदेश्वर गावातील एक गंभीर बाब समोर आली आहे. नंदेश्वर-जुनोनी मार्गालगत गावाच्या अगदी जवळच एक धोकादायक विहीर असून, सध्या त्या परिसरातून राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गाचे काम विहिरीच्या अत्यंत जवळून जात असल्याने रस्त्याची साईडपट्टीच विहिरीत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात येथे मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे या विहिरीपासून काही अंतरावरच श्री बाळकृष्ण विद्यालय व महाविद्यालय ही मोठी शैक्षणिक संस्था असून, दररोज शेकडो विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ या मार्गाने प्रवास करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तसेच प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे या विहिरीची तातडीने दखल घेऊन ती बुजवावी अशी मागणी केली आहे.























