गोरखपूर:
उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील कॅन्ट पोलीस स्टेशन हद्दीतील मोहाद्दीपूर कालव्याच्या पुलाजवळ मंगळवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तीन दुचाकींच्या जोरदार धडकेत 3 पुरुष आणि 2 मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतक एका शुभकार्यक्रमावरून परतत असताना हा अपघात झाला. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी रुग्णालयात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. तीनही दुचाकीस्वार भरधाव वेगात असल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून घटनेचा सविस्तर तपास सुरू केला असून, मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.




















