नंदेश्वर | प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्र राज्याने दिलेला शब्द पाळणारे, विकासाभिमुख, स्पष्टवक्ते आणि तोंडावर सत्य बोलणारे बहुआयामी नेतृत्व गमावले असून ही राज्यासाठी मोठी हानी आहे, अशी शोकप्रतिक्रिया भोसे जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तथा माजी सभापती प्रदीप खांडेकर यांनी व्यक्त केली. नंदेश्वर येथे स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित शोकसभेत ते बोलत होते. यावेळी परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदीप खांडेकर पुढे म्हणाले की, स्व. अजितदादा पवार हे राजकारणात शब्दाला किंमत देणारे नेते होते. त्यांनी घेतलेला निर्णय ठाम असायचा आणि तो पूर्ण करण्यासाठी ते अखेरपर्यंत प्रयत्नशील राहायचे. राज्याच्या विकासासाठी त्यांनी पायाभूत सुविधा, रस्ते, वीज, पाणी यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात भरीव योगदान दिले. त्यांच्या कार्यशैलीमुळे सामान्य माणसाच्या मनात त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला होता. स्व. अजितदादा पवार यांचे नेतृत्व केवळ राजकीय नव्हते तर प्रशासकीय बाबींमध्येही ते तितकेच सक्षम होते. त्यांनी अनेक कठीण प्रसंगी कठोर निर्णय घेतले आणि राज्यहिताला प्राधान्य दिले. अशा नेत्याच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे असेही यावेळी बोलताना खांडेकर म्हणाले.
या शोकसभेला माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर, माजी शिवसेना तालुकाप्रमुख अशोक चौंडे, माऊली विकास सेवा सोसायटीचे चेअरमन भारत गरंडे, माजी सरपंच अनिल गरंडे, ग्रामपंचायत सदस्य पिंटू बंडगर, युवक नेते जयसिंग कांबळे, बादल कळकुंबे, ज्ञानू गरंडे, पै. दत्ता मोठे, गजेंद्र दोलतडे, विजय डांगे, बाळासाहेब कांबळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. शोकसभेच्या शेवटी दोन मिनिटांचे मौन पाळून स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा आणि नेतृत्वाचा आदरपूर्वक उल्लेख करत त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना केली.























