नंदेश्वर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी येथील न्यू इंडियन गुरुकुल आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स ज्युनिअर कॉलेजतर्फे अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेशोत्सव उपक्रम राबविण्यात येत आहे. मार्च 2026 मध्ये इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी 10 एप्रिल 2026 पासून अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याला (पार्ट-1) सुरुवात झाली आहे.

प्रवेश फॉर्म मोफत भरून देण्याची सुविधा
संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री बंडू गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशाचे सर्व फॉर्म पूर्णपणे मोफत भरून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची माहिती तसेच विविध दाखले मिळविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन दिले जाणार आहे.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची तयारी करणे गरजेचे – संस्थापक बंडू गडदे यांचे आवाहन
अकरावी प्रवेश प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होते. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती भरली जाते, तर दुसऱ्या टप्प्यात दहावीचा निकाल लागल्यानंतर गुणपत्रिका व इतर आवश्यक कागदपत्रांची नोंद केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापासूनच आवश्यक कागदपत्रांची तयारी करून ठेवणे गरजेचे असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले आहे. शैक्षणिक शिष्यवृत्ती, आरक्षण आणि इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी डोमिसाईल प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, नॉन-क्रीमीलेअर सर्टिफिकेट, दिव्यांग प्रमाणपत्र यांसारख्या कागदपत्रांची आवश्यकता असते. त्यामुळे दहावीचा निकाल लागल्यानंतर होणारी गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी ही कागदपत्रे आत्ताच काढण्यास सुरुवात करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

गुरुकुल संस्थेने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली सुवर्णसंधी
दरवर्षी निकालानंतर तहसील कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अडचणी येतात. ही अडचण टाळण्यासाठी गुरुकुल संस्थेने विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील शिरनांदगी, रड्डे, चिखलगी, लवंगी, मारोळी, जाडर, बोबलाद, सलगर, भोसे, नंदेश्वर, हुन्नूर, महमदाबाद, लोणार, रेवेवाडी तसेच परिसरातील इतर गावांतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संस्थापक बंडू गडदे आणि प्राचार्य यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर कॉलेज कार्यालयात भेट देऊन अकरावी प्रवेशासंदर्भातील संपूर्ण माहिती व मार्गदर्शन घ्यावे, जेणेकरून पुढील शैक्षणिक वाटचाल अधिक सुलभ आणि सुरळीत होईल, असेही संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.





















