नंदेश्वर / प्रतिनिधी : नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील पंकज सुभाष पवार याने अत्यंत प्रतिकूल व गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत आपल्या जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस दलात निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण नंदेश्वर गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

पंकज पवार यांचे प्राथमिक, माध्यमिक तसेच महाविद्यालयीन शिक्षण नंदेश्वर येथील श्री बाळकृष्ण विद्यालय अँड ज्युनियर कॉलेजमध्ये झाले. आर्थिक अडचणींना न जुमानता त्यांनी सातत्याने अभ्यास करत आपले लक्ष्य साध्य केले. त्याच्या यशामागे कुटुंबाचे सहकार्य, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची जिद्द यांचा मोठा वाटा आहे.

पंकज याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल नंदेश्वर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास पत्रकार बाबासाहेब सासणे, सतीश गरंडे, महावीर लवटे, प्रीतम पवार, विघ्नेश कांबळे, वाघमारे यांच्यासह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी पंकज पवार यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या यशामुळे गावातील इतर युवकांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.























