मंगळवेढा / विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संस्था व संघटनांना एका व्यापक व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लोहार समाज राज्यस्तरीय महापरिषदेचा स्थापना व उद्घाटन सोहळा रविवार, दि. ९ ऑगस्ट, क्रांतीदिनी उत्साहात पार पडला. या सोहळ्यास राज्यभरातील लोहार समाजाच्या विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रतिनिधी उपस्थित होते. समाजाच्या विविध प्रश्नांवर एकत्रितपणे आवाज उठविण्यासाठी राज्यस्तरीय व्यासपीठ निर्माण होणे ही समाजाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब मानली जात आहे.
महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या विविध संघटना एका व्यापक व्यासपीठाखाली याव्यात, समाजाच्या प्रश्नांवर एकमुखाने भूमिका मांडली जावी आणि संपूर्ण राज्यभरात लोहार समाजाचा प्रभावी दबावगट निर्माण व्हावा, अशी समाजबांधवांची गेल्या अनेक वर्षांपासूनची अपेक्षा होती. राज्यस्तरीय महापरिषदेच्या माध्यमातून या अपेक्षेला आता मूर्त स्वरूप मिळण्यास सुरुवात झाली आहे.
मात्र, सोलापूर जिल्ह्याने ही संकल्पना राज्यस्तरावर आकार घेण्यापूर्वीच प्रत्यक्ष कृतीत आणली आहे, असे चित्र निर्माण झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील लोहार समाजाच्या विविध संघटना परस्परांतील मतभेद बाजूला ठेवून समाजहितासाठी एकत्र आल्या असून, समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात सामूहिकपणे आवाज उठविण्याचे काम त्यांनी केले आहे.

सोलापूर जिल्ह्यात विश्वकर्मा लोहार विकास संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब कळसाईत, सोलापूर लोहार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेश लोहार, श्री विश्वकर्मा लोहार युवक संघटनेचे अध्यक्ष यशवंत कळसाईत, लोहार युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी लोहार यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांनी एकत्रित भूमिका घेतली. समाजाच्या प्रश्नांवर एखाद्या एका संघटनेपुरता लढा मर्यादित न ठेवता सर्व संघटनांनी एकत्र येऊन प्रश्न मांडल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात लोहार समाजाचा प्रभावी दबावगट निर्माण झाला आहे.
विविध सामाजिक प्रश्न, समाजावर होणारा अन्याय आणि समाजाच्या हक्कांच्या मागण्यांसाठी संघटनांनी एकत्रितपणे भूमिका घेतल्याने प्रशासन व शासनस्तरावरही या एकजुटीची दखल घेतली जात असल्याचे दिसून येते. संघटनांच्या या एकजुटीमुळे समाजातील सामान्य नागरिकांमध्येही आपल्या प्रश्नांसाठी एकत्र येण्याचा विश्वास निर्माण झाला आहे. राज्यस्तरीय महापरिषदेच्या स्थापनेमुळे आता महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या लोहार समाजाच्या संस्था-संघटनांना एकत्र आणण्याचे काम अधिक व्यापक पातळीवर होणार आहे. समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय प्रश्नांवर एकत्रितपणे भूमिका घेण्यासाठी हे व्यासपीठ महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्यस्तरावर विविध संघटनांना एकत्र आणण्याची जी संकल्पना आता महापरिषदेच्या माध्यमातून प्रत्यक्षात येत आहे, तिची प्रभावी सुरुवात सोलापूर जिल्ह्यात यापूर्वीच झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोहार समाजाच्या संघटनात्मक एकीची खरी मुहूर्तमेढ सोलापूर जिल्ह्याने रोवली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सोलापूर जिल्ह्यातील संघटनांनी दाखविलेली ही एकजूट राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही आदर्श ठरू शकते. समाजाच्या व्यापक हितासाठी व्यक्ती, गट किंवा संघटनेपेक्षा ‘समाजहित सर्वोपरी’ ही भूमिका स्वीकारून सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास लोहार समाजाचा राज्यस्तरावर प्रभावी दबावगट निर्माण होण्यास निश्चितच बळ मिळणार आहे.























