नंदेश्वर येथे रविवारी होणार गुरुमाऊली पतसंस्थेचा उदघाटन समारंभ
नंदेश्वर/ प्रतिनिधी
नंदेश्वर ता. मंगळवेढा येथे गुरुमाऊली महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन समारंभ रविवार दि. ३ रोजी होणार असल्याची माहिती गुरुमाऊली पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. आ.समाधान आवताडे आणि श्री बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज यांच्या शुभहस्ते गुरुमाऊली पतसंस्थेचा उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदेश्वर येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि पुणे येथील तनिष आयकॉन गृहनिर्माण सोसायटीच्या चेअरमन रुक्मिणी दोलतडे असणार आहेत. तसेच या कार्यक्रमात भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत, दामाजीचे व्हा.चेअरमन तानाजी खरात, माजी सभापती प्रदीप खांडेकर, दामाजीचे संचालक औदुंबर वाडदेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याशिवाय उद्घाटन प्रसंगी नंदेश्वर येथील सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य इतर सर्व संस्थांचे पदाधिकारी पतसंस्थांचे चेअरमन, संचालक, विविध पक्षांचे पदाधिकारी, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

नंदेश्वर येथील बाबुराव मोटे यांनी गुरुमाऊली दूध संस्थेच्या माध्यमातून छोटेसे रोपटे लावले होते. आज गुरुमाऊली पतसंस्थेच्या रूपाने त्या लावलेल्या छोट्या रोपट्याचा वटवृक्ष होताना दिसत आहे. भविष्यातही वेगवेगळ्या संकल्पना राबवून गुरुमाऊली उद्योग समूह स्थापन करण्याचा मोटे कुटुंबीयांचा मानस आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून गुरुमाऊली पतसंस्था आज नंदेश्वर व तसेच परिसरातील लोकांच्या सेवेत सुरू करीत असल्याची माहिती राहुल मोटे यांनी दिली आहे.




















