(टीम सोलापूर आजतक)
गावातील वादविवाद, तंटे गावातच मिटावेत, शांतता व सलोखा टिकून रहावा यासाठी महात्मा गांधी तंटामुक्ती समितीची संकल्पना राज्यात राबविली जात आहे. मात्र, या समितीच्या अध्यक्षांची निवड करताना अनेकदा चक्क तुंबळ हाणामारी, भांडणे झालेले पाहिले आहे. पण निवडणुकीतून तंटामुक्ती अध्यक्षाची निवड होणे हा प्रकार पहिल्यांदाच अनुभवायला मिळाला आहे.

तावशी (ता.पंढरपूर) येथे आयोजित केलेल्या सभेत अभूतपूर्व गदारोळ झाला. अखेर मतदान घेण्यात आले. मतमोजणीअंती समितीच्या अध्यक्षपदी गतवेळचे अध्यक्ष सिद्धेश्वर यादव हे विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले.तावशी येथील ग्रामपंचायतीच्या आवारात तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष निवडीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली.

यासाठी उमेदवारांनी प्रचार केल्याने कमालीची चुरस निर्माण होऊन निवडीला ग्रामपंचायत निवडणुकीचे स्वरूप आले. ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी या प्रक्रियेत उत्साहाने सहभाग घेतला. अखेर या निवडणुकीत सिद्धेश्वर यादव यांचा विजय झाला. या समितीचे अध्यक्षपद गावातील ज्येष्ठ, जाणकार, सामाजिक कार्यकर्त्यांना बहाल केले जाते. मात्र, तावशी येथे चक्क निवडणूक प्रक्रिया राबवावी लागल्याने सर्वत्र हा चर्चेचा विषय ठरला आहे. ग्रामसेविका सगुना सरवदे, तलाठी आनंद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.





















