मंगळवेढा / तालुका प्रतिनिधी
गोणेवाडी (ता.मंगळवेढा) हद्दीतील ऊस शेत परिसरात सोमवार दि.२२ रोजी बिबट्यासदृश प्राणी दिसल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास लेंडवे चिंचाळे येथील शेतकरी दादासो राजाराम लेंडवे हे कामानिमित्त शेतात गेले असता, ऊस शेताच्या बांधावरून बिबट्यासदृश प्राणी जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आला होता.

बिबट्या नव्हे तरस
सुमारे २०० ते ३०० फूट अंतरावरून त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये त्या प्राण्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर ही माहिती त्यांनी तात्काळ लेंडवे चिंचाळे येथील पोलीस पाटील हिम्मतराव पाटील यांना दिली होती. घटनेची दखल घेत पोलीस पाटील यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेमार्फतही परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. वनविभागाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करण्याची परिसरातील ग्रामस्थांनी मागणी केली होती. यानुसार वनविभागाचे वनपाल संतोष मुंडे, वनसेवक भागवत मासाळ व कर्मचाऱ्यांनी तात्काळ सदर परिसरात पाहणी केल्यानंतर गोणेवाडी, आंधळगाव,गणेशवाडी परिसरात दिसला गेलेला बिबट्या सदृश्य प्राणी हा बिबट्या नसून तो तरस असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
तरस माणसांवर हल्ला करत नाही
तरस हा प्राणी माणसावर हल्ला करत नसून तो मृत जनावरांचे मांस भक्षण करतो. असे सांगण्यात आले. पशूपालकांनी आपली जनावरे गोठ्यात सुरक्षीत ठिकाणी बांधून त्यांची दक्षता घ्यावी तसेच पालकांनी लहान मुलांची काळजी घ्यावी असे आवाहन वन विभाग प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान गणेशवाडी येथून तुकाराम कोळेकर हे मंगळवार दि. २३ रोजी कचरेवाडीच्या दिशेने आपल्या चार चाकी वाहनामधून जात असताना गोशाळेजवळ बिबट्या सदृश्य प्राण्याने तुकाराम कोळेकर यांच्या गाडीवर झाप मारली व तेथून हा प्राणी गोशाळेच्या पाठीमागच्या तळ्याच्या दिशेने गेलेला त्यांना दिसला तरी सर्व गणेशवाडी ग्रामस्थांनी सतर्क राहावे असे आवाहन केलेले सोशल मीडियावर दिसले.























